Friday, January 8, 2010

पंखा (स्वलिखित कविता)


पंखा
माणसाने निराश झाल्यावर पाहिजेतर गटारात बसावं
नाहीतर रस्त्याच्या कडेला ऊभे राहुन जोरजोरात हसावं
पण पंख्याला लटकून आत्महत्या करू नये
आपल्या आयुष्याचा राग त्या पंख्यावर धरू नये

त्याने का सोसावा तुमचा भार
आधीच तो गरगर फिरून होतो बेजार
कृतघ्न तुम्ही कर्तव्य चुकवता
आपल्या वजनाने त्यालाही झुकवता

तुमच्या मरणानंतर तो
फिरण्यालायक राहत नाही
भुताटकीचा पंखा म्हणून
भंगारात सुध्दा जात नाही

तुमच्या मृत्युचे साधन म्हणून
त्याचेही नाव घेतले जाते
तुमची तर काही राहत नाही
त्याची मात्र नाहक अब्रु जाते

दया करा त्या पंख्यावर
हवंतर बसा पंख्याखाली
शांत डोक्याने हवा खा
विज असेल तर बटण चालू केल्यावर तो करे सेवा बहाली

थंडपणे विचार करा
काय फायदा आत्महत्या केल्यावर
माहिती आहे ना काय होते
पुर्व आरक्षणाशिवाय प्रवासाला गेल्यावर

फुकटचे हाल होतात
हाती काही लागत नाही
समस्या तिथेच राहतात
आत्महत्या करून भागत नाही

म्हणूनच माणसाने माणसासारखे वागावे
रात्री शांत पंख्याखाली झोपुन सकाळी कामास लागावे
कष्ट करुन धीर धरल्यास प्रश्न केव्हा ना केव्हा सुटतात
ज्या व्यक्ती अविरत संघर्ष करतात त्याच जीवनाचा आनंद लुटतात

खरं सांगतो दुसर्‍यांच्या अनुभवाने
मरणाचा नाद धरू नका
पंख्याचे खरे काम हवा देणे
त्याला लटकवून मरू नका

-प्रशांत गंगावणे
prashant.gangawane@gmail.com
मोबाईल : ९३२२९०६३१८

No comments: